पुणे : उत्सवांना जे काही विडंबनात्मक स्वरूप आलेला आहे, त्या आवाजाचा त्रास सगळ्यांना होतो. पर्यावरणाचं नुकसान होतंय, प्राणीमात्रांना त्याचा त्रास होतोय. मनुष्यप्रणालाही त्याचा त्रास होतोय. घरी असलेल्या आजारी वृद्ध लोकांना त्याचा त्रास होतोय. दहीहंडीच्या वेळेला, नवरात्राच्या वेळेला जो काही धिंगाणा चालतो त्यावर निर्बंध घातलेच पाहिजे. आता इथे गौतमी पाटीलला बोलवले आहे. आता याच्यात कुठली धार्मिकता आहे? तुम्ही या अर्धनग्न अवस्थेमध्ये जर महिला इथे येऊन अंगविक्षेप करत असतील तर हे कृष्णाला तरी आवडणार आहे का? गणपतीला तरी आवडणारे का? अशी रोखठोक भूमिका भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी मांडली आहे.
दरम्यान, नियम सर्वांना सारखे आहेत. कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा यात संबंध नाही. कुठल्याही जयंत्या, पुण्यतिथ्या, सण-वार, कुठल्याही धर्माचे असू देत, रस्त्यावर येऊन धांगडधिंगा केल्यावरच त्याला धार्मिकता येते, असं मला वाटत नसल्याचेही मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
काही उत्सवाच्या बाबतीत मला असं वाटतं की हे विकृत स्वरूप धारण झालय. याला मी धार्मिकता नाही मानत. मी आस्तिक आहे. मी स्वतः देव देश आणि धर्म मानणारी व्यक्ती असून वेळोवेळी धर्माच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून काम करणारी प्रतिनिधी आहे. तरीपण मी या विरोधात आहे. गौतमी पाटीलला घेऊन जर तुम्ही धिंगाणा घालत असाल तर तुम्ही श्रीकृष्णाची नीतीच ओळखली नाही. त्याचे अनेक वेगवेगळे पैलू आहेत ते पहिले पाहिजेत. त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्याचा अवलंब केला पाहिजे असेही भाजप खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
अशा पद्धतीने आपण दुसर्याच्या अधिकारावर गदा आणतोय, हे चुकीचंय
नवरात्रीमध्ये देवीची उपासना करायची सोडून तुम्ही दांडिया करताय, तिथे घाणेरड्या अर्थाची गाणी वाजताय. ज्या देवी घराघरांमध्ये आजारी आहेत आणि थकून घरी आलेले नागरिक आहेत, त्यांना तुम्ही स्वतःच्या घरामध्ये राहू नाही देणार का? हा कुठला प्रकार आहे? तुम्हाला निर्बंध नकोय, पण त्यांना बंधन पाळावी लागतात ना, मग स्वातंत्र्याचा अर्थ असा नाहीये की जो तुम्हालाच स्वातंत्र्य आहे. संविधानात स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे की आपल्या कुठल्याही अधिकारामुळे दुसर्याच्या अधिकारांचा पायमल्ली होणार नाही. अशा पद्धतीने आपन दुसर्याच्या अधिकारावर गदा आणतोय. हे मला असं वाटतं चुकीचं ठरतंय.
गणेश मंडळांना आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा माझं आवाहन
पुण्यातील गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवाजाचा त्रास लोकांना होत असेल आणि तो होतोच. तर ते टाळलं पाहिजे. गणेश मंडळांना माझं आवाहन लोकप्रतिनिधींना सुद्धा आवाहन की पुणेकर नागरिकांना खूप त्रास होतोय. सोसायटी असतील, आता गावातले जे एरिया आहेत तिथेही खूप कंजस्टेड एरिया आहेत तिथे आणि बाहेरच्या सुद्धा भागामध्ये खूप गणेश उत्सव मंडळ झाले आहेत. खूप मोठ्या आवाजात वेगवेगळ्या प्रकारची अश्लील गाणी लावणं योग्य नाही. असं मला वाटतं डीजेला, प्लाजमा वगैरे आणि नवीन आलेले आहेत त्या मोठ्या साऊंडचा खूप त्रास होतो. त्यामुळे हे सगळं बंद करून आपण अतिशय धार्मिक पद्धतीने सण साजरा केले पाहिजेत. असे आवाहन देखील मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे.